गप्पा गणिताच्या (The Math Gossips)

            गणित (Mathematics) या विषयाला, 'सर्वात जास्त अवघड विषय' अशी ओळख प्राप्त झाल्याचे हल्ली दिसून येते. शालेय मुलांना विचारले, की "तुम्हला कोणता विषय अवघड जातो", सामान्यपणे सर्वांचे बोट 'गणिताकडे' जाते. पण खरंच तसे आहे का? या प्रश्नाचे उत्तर आज आपण शोधण्याचा प्रयत्न करू😊.
         आपण जीवन जगत असताना आपल्या सभोताली सर्वत्र गणिताचा वावर आहेच.. मग ज्या वातावरणात आपण श्वास घेतो, तिथली हवा, पाणी आपल्याला प्रतिकूल कशी बरे असू शकेल?? तरीही, गणिताचा बाऊ हा विद्यार्थ्यांच्या मनात निर्माण होण्याची बरीच कारणे आहेत. त्यांना गणिताचे अध्यापन करण्याच्या पद्धती, पुस्तकी गोष्टींवर भर, पाठ करण्याच्या सवयी, विद्यार्थ्यांची गणित अध्ययन करण्याची पद्धत, विद्यार्थ्यांनी गणिताकडे फिरवलेली पाठ, इत्यादी.

        गणित हा विषय इतर विषयांच्या तुलनेत थोडा वेगळा आहे नक्की, पण परीक्षेत पूर्ण गुण गणित आपल्याला मिळवून देऊ शकते याची पूर्ण शास्वती असते. हा, पण गणितात शिस्तीला खूप महत्व आहे. आता गणितातील शिस्त म्हणजे नेमके काय?? सांगतो.. गणितातील कोणताही प्रश्न अगदीच नवीन असा कधीच नसतो. तो अगोदर अभ्यासलेल्या 'मूलभूत गणितीय संकल्पांनवर' आधारित असतो. म्हणजेच, गणितातील मुलभुत संकल्पना, जसे रेषा, बिंदू, प्रतल, चल, अचल, संख्यारेषा, चिन्हांच्या संकल्पना, मूलभूत आकडेमोड, आकृत्यांचे गुणधर्म, गणितीय सूत्रे, इत्यादी. हे माहीत असणे आणि त्यांचा योग्य ठिकाणी कसा उपयोग करावा,  याची समज म्हणजेच गणितातील शिस्त.
          आता या मूलभूत संकल्पना फक्त परीक्षेतील मार्कांसाठी अभ्यासून काही दिवसात विसरून जाणे म्हणजेच 'गणितातील शिस्त भंग करणे होय'. मग शिस्त भंग केल्यास कसे बरे आपण सीमेवरील शिपाई होऊ?  नाही ना? मग त्यासाठी आपण या मूलभूत संकल्पना पाठ न करता समजून घेणे गरजेचे आहे.

कसा करता येईल गणिताचा अभ्यास अधिक मनोरंजक?

पहिली गोष्ट, गणितातील सूत्रे एका छानशा कागदावर लिहून आपल्या अभ्यास खोलीत लावा. त्याकडे दररोज पहा, पाठ करण्याचा प्रयत्न करू नका. 

वर्गात शिकवलेले गणित वर्गातच समजून घ्या आणि सरांनी वर्गात न घेतलेली गणिते घरी सोडवा, दररोज अगदी 4-5 सोडवली तरी चालतील. 

गणित सोडवताना आपल्याला किती मार्क्स मिळतील याचा अजिबात विचार करू नका.

एकच गणित वेगवेगळ्या पद्धतीने सोडवता येईल का, याचा विचार करून तसे सोडवून पहा. याने आत्मविश्वास वाढेल.

गणिते शक्य तो रात्रीच्या वेळी सोडवायला घ्या.

मूळ सुत्रांपासून नवीन सूत्रे तयार करता येतील का ते पहा.
उदा. (a+b)² = a²+2ab+b² यापासुन
a²+b² = (a+b)² - 2ab
किंवा, (a-b)² = a² -2ab+b² यापासुन
a²+b² = (a - b)² + 2ab असे.

शिक्षकांसोबत संवाद साधा....

आपल्या मित्र मैत्रिणींना गणिते सोडवून दाखवा आणि त्यांच्याही पद्धतीने गणित समजून घ्या. 

गणित सोडवताना आजूबाजूचे वातावरण शांत आहे याची खात्री करा.

मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकेतील वेगळी वाटणारी गणिते संकलित करा आणि सोडवण्याचा प्रयत्न करा.

गणितातील संकल्पनांना आपल्या दैनानंदिन जीवनाशी जोडण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा.

गणितातील गमतीशीर कोडे सोडावा, गणितीय खेळ खेळा.

       वरील प्रमाणे गणितातील शिस्त पाळली तर अवघड वाटणारा गणित विषय पहा तुम्हाला अगदीच सोपा वाटेल.
गणित हे फक्त परीक्षेत मार्क्स मिळविण्यासाठी आहे , असे अजिबात नाही. गणिताने आपली तर्कशक्ती (logical reasoning) कमालीची वाढते. त्यामुळे दैनंदिन जीवनातील अनेक प्रश्न सोडविणे (problem solving) किती सहज आणि मजेशीर होईल याची अनुभूती तुम्हाला येईल. 
परिणामी तुम्ही गणिताच्या प्रेमात पडाल❤️. मग काय, मज्जाच मज्जा😊. गणितावर बोलण्यासारखे पुष्कळ आहे. पण आजच्यासाठी येवढेच.


                                                          -माणिक शिंदे
                                                         गणित अध्यापक,
                                                      शा.न.माध्य.वि., पाथरी




Comments